मूल.ता- चंद्रपूर-गडचिरोली या दोन्ही जिल्हयाचे मध्यवर्ती ठिकाण असलेल्या मूल शहरातील आगार निर्मीतीची मागणी बाबत एसटी महामंडळाची उदासिनता जनतेमध्ये असंतोष निर्माण करणारी असुन लोकप्रतिनिधींनी जनतेच्या मागणीकडे लक्ष देण्याची गरज आहे.
व्यवसायीक दृष्टीने प्रगत असलेल्या मूल शहरातील बसस्थानकातून दरदिवसा सुमारे ६५० बसफे-या होत असतात. दररोज शेकडो प्रवाश्यांचे आवागमन असणा-या येथील बसस्थानकात गडचिरोली आणि चंद्रपूर सोबतच ब्रम्हपूरी,चिमुर आगारातील बसेस प्रवाश्यांना सेवा पुरवितात. परंतु लग्नसमारंभ वा शैक्षणिक सहल,अभ्यासदौरा आदींसाठी प्रासंगिक करारासाठी या परिसरातील नागरीकांना गडचिरोली अथवा चंद्रपूर आगारातुनच बसेसची मागणी करावी लागते. यात ४०-४० किलोमिटरचा अतिरीक्त भुर्दंड भरावा लागतो. त्याच प्रमाणे एखाद वेळेस मार्गात बस बंद पडल्यास बदली बस करीता गडचिराली अथवा चंद्रपूर आगाराकडुनच बस मागवावी लागते. यात प्रवाश्यांच्या वेळेचा खेळखंडोबा होतो.
मूल हे तालुक्याचे ठिकाण असल्याने इथे तालुक्यातील ग्रामीण भागातुन शेकडो मुलं-मुली षिक्षणासाठी येतात. त्यांना शाळा महाविदयालय सुटल्यानंतर गावाकडे परत जाण्यासाठी बसेस मिळत नाही. कित्येकदा शालेय विदयाथ्र्यांना रात्री ८-८ वाजेपर्यंत बसस्थानकात बसेची वाट पाहत उपाशी ताटकळत राहावे लागते. अशावेळी पालकांच्या काळजीबाबत विचारणाच नको. याकरीता मूल येथे आगाराची मागणी केली जात आहे.
मागील सुमारे ४० वर्षा पासून आगराची मागणी होत असुन आगारासाठी जागा आरक्षीत केलेली आहे. तसेच मूल येथे आगार होण्यासाठी स्थानीक लोकप्रतिनिधींनी उपोषण आंदोलने केली तरीही एसटी महामंडळ जनतेचा या मागणीबाबत उदासिनता दाखवित आहे. येथे आगाराची निर्मीती करण्यासाठी तत्कालीन पालकमंत्री तथा विदयमान आमदार सुधीर मुनगंटीवार यांना जनतेच्या वतीने निवेदनही देण्यात आले. त्यांच्या सत्तेच्या कार्यकाळ संपुनही गेला मात्र आगाराची निर्मीती झाली नाही. मात्र दहा कोटीचे अर्धवट बसस्थानक प्रवाश्यांच्या माथी मारल्या गेले. ज्यात प्रवाश्यांना खाण्याची ना पिण्याचे पाण्याची सोय आहे. बस आगार नसल्याने मागणीप्रमाणे प्रवाश्यांच्या वेळेत बस उपलब्ध करून देणे शक्य होत नाही. त्यामुळे येथील वाहतुक नियंत्रकाला प्रवाश्यांच्या रोषाला नाहक बळी पडावे लागते. सुरक्षीत व रास्त दरात प्रवास होत असल्याने सर्वच प्रवासी एसटी महामंडळाचा बसने प्रवास करण्यास प्राधान्य देतात. मात्र प्रवाश्यांच्या वेळेत बस मिळत नसल्याने नाईलाजाने प्रवाश्यांना खाजगीप्रवासी वाहनांकडे वळावे लागते. एसटी महामंडळाचे मूल येथे आगार झाल्यास दोन्ही जिल्हयात सर्वाधिक उत्पन्न देणारे आगार म्हणुन नोंद केली जाईल इतकी प्रवासी संख्या इथे उपलब्ध आहे आणि ही बाब एसटी महामंडळांच्या अधिका-यांना माहिती आहे. तरीपण येथील आगाराबाबत एसटी महामंडळाचे प्रशासन उदासिनता बाळगुन असण्यामागील कारण काय असा प्रश्न विचारल्या जातो.
शेकडो प्रवासी रोज प्रवास करीत असल्याने अनेकदा बसाच्यां कमतरतेमूळे नाहक त्रास सहन करावा लागतो. यामुळे येथे बस आगार देण्यात यावा अशी मागणी मागील चाळीस वर्षांपूर्वी पासुन होत आहे. आज पर्यंतचा सर्वच लोकप्रतिनिधींना निवेदनाव्दारे तसेच प्रत्यक्षात येथे आगाराची निर्मीती करण्याची विनंती केली आहे. परंतु एसटी महामंडळाच्या काहीतरी विचीत्र निकषाची अडचण सांगुन आगाराची मागणी बासनात गुंडाळुन ठेवली आहे.