गांगलवाडी येथील घटना,डोंगरगाव तलावात केली आत्महत्या
मूल.ता. यावर्षी झालेल्या अतिपावसाने हाती येणारे पीक शेतक-यांना गमवावे लागले आहे. पीक हातचे गेल्याने वैफल्यग्रस्त झालेल्या तालुक्यातील गांगलवाडी येथील एका तरूण शेतक-याने डोंगरगाव येथील तलावात उडी घेऊन आत्महत्या केली. सदर घटना काल ता. 22 ला रात्री घडली असुन आज उघडकीस आली. मृतक शेतक-याचे नाव संजय जनार्दन चिचघरे वय 38 वर्षे आहे. काल रात्री पानठेल्यावरून खर्रा खावुन येतो असे पत्नीला सांगुन गेल्यानंतर आज सकाळ पर्यंत परत न आल्याने त्याची पत्नी आणि नातेवाईकांनी सगळीकडे शोधाशोध सुरू केली. दरम्यान गांगलवाडी पासुन जवळच असलेल्या डोंगरगाव तलावात कोणत्यातरी इसमाचे प्रेत तरंगत असल्याचे काही गावक-यांनी पाहीले. काहींना ओळख पटल्याने सदर घटनेची माहिती संजयच्या घरच्यांना देण्यात आली. मागील अनेक दिवसांपासून संजय चिंतेत असल्याचे सांगितले जाते. यावर्षीचा अतिपावसामुळे मूल तालुक्यातील बहुतांश भागातील धान पीक नष्ट झाले. संजयच्या शेतीची पण धुळधान झाल्याने कर्ज आणि इतर देणी कुठून देता येईल याविवंचने असल्याने त्याने आत्महत्याचा मार्ग पत्करल्याचे सांगितले जात आहे.